DHULE |- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात वाढलेली आर्द्रता, परिसरात साचलेले पाणी, यामुळे लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असून, सध्या लहान मुलांमध्ये श्वसनमार्गाचे विषाणूजन्य आजारात वाढ होऊ लागली आहे. शालेय मुलांमध्ये 'फ्लू' आजाराची तर एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये 'रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस' या श्वसन संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण धुळ्यातील बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिनय दरवडे यांनी यावेळी सांगितले.
पावसाळ्यातील वातावरणामुळे सध्या शहरात साथीच्या आजारांबरोबरच डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांनी नागरिकांना बेजार केले आहे. हे वातावरण लहान मुलांच्या आरोग्यासही बाधक ठरत असून, लहान मुलांमध्ये फ्लू, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (आरएसव्ही) हा श्वसनाशी निगडित आजार बळावत असल्याचे दिसून येत आहेत. आरएसव्ही हा संसर्ग मुलांच्या श्वासनलिका व फुप्फुसांवर परिणामकारक ठरत आहे.
या आजारांच्या मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप येणे, धापलागणे, हात-पाय काळे, निळे पडणे यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने ही मुले या आजाराला बळी पडत आहेत.
मुलांना जास्त सर्दी, खोकला उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, मुलाच्या नाकपुड्या वेगाने हालणे, धाप लागणे, झोपेत कण्हणे यासारख्या लक्षणांकडे लक्ष ठेवणे, घरात स्वच्छता राखणे, मुलांना आजारी व्यक्तींपासून दूर ठेवणे, मुलांचे लसीकरण करून घेणे, मुलांना सकस आहार, स्वच्छ व उकळलेले पाणी देणे, मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळावे असे आवाहन डॉ अभिनय दरवडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा